पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये एटीएम आणि प्रिंट मशीनवर मराठीऐवजी फक्त हिंदी भाषेत सूचना दाखवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हवेली तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध मराठे यांनी बँक प्रशासनाला इशारा दिला आहे की, “इथून पुढे माहिती मराठी भाषेत असली पाहिजे, अन्यथा मनसेच्या शैलीत आंदोलन करण्यात येईल!”
मराठे यांनी सांगितले की, “गेल्या महिन्यातच आम्ही बँक मॅनेजर यांना लेखी स्वरूपात विनंती केली होती की, मशीनवरील सर्व सूचना मराठी भाषेत व ठळक अक्षरांत दाखवाव्यात. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आज अनेक नागरिकांकडून तक्रारी येत आहेत की मशीनवर माहिती फक्त हिंदीत असल्याने समजत नाही, आणि त्यामुळे व्यवहार करताना अडचणी येतात. विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिलांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.”
मराठे यांनी पुढे सांगितले की, “मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. सरकारी बँकांनी तिचा सन्मान राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे. नागरिकांना त्रास देणारी ही भाषा धोरणाची दुर्लक्ष करण्याची वृत्ती आम्ही सहन करणार नाही.”
स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आग्रह आहे की, बँक प्रशासनाने मराठी भाषेचा सन्मान राखत सर्व सेवा मराठीत उपलब्ध करून द्याव्यात.
दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर बँकेसमोर आता मराठी भाषेचा सन्मान राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.