पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) स्थानिक परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आश्रम रोड व एमजी रोड परिसरातील सर्व व्यापारी व दुकानदार बांधवांची ही बैठक वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
बैठकीत परिसरातील वाहतूक कोंडी, अनियमित पार्किंग, पादचारी सुरक्षितता तसेच सण-उत्सव काळातील वाढती गर्दी नियंत्रण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलिस प्रशासनाने व्यापाऱ्यांना वाहतूक शिस्त पाळण्याबाबत मार्गदर्शन करत पुढील काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यामध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण व चुकीचे पार्किंग त्वरित हटविणे, प्रत्येक दुकानदाराने दुकानासमोर शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था ठेवणे, वाहतूक पोलिसांना आवश्यक सहकार्य करणे, सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी परस्पर सहकार्य करणे तसेच व्यापारी संघटना व स्थानिक प्रशासनाने संयुक्तरित्या जनजागृती मोहीम राबविणे यांचा समावेश आहे.
या बैठकीस स्थानिक व्यापारी संघाचे पदाधिकारी, पोलिस कर्मचारी व वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांकडून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वांनी पोलिस प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीतून परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर, सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस व व्यापाऱ्यांचे हे संयुक्त प्रयत्न नक्कीच आदर्श ठरतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.