पुणे : “आत्मा हा शरीराचा अविभाज्य घटक असून त्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहते. आत्मा अमर आहे, तर शरीर नश्वर आहे. जसे मनुष्य जुने कपडे बदलतो तसे आत्मा जीर्ण शरीर सोडतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार ह. भ. प. डॉ. रवींद्र भोळे यांनी केले. वळती (ता. हवेली) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याच्या वेळी ते गीतेतील दुसऱ्या अध्यायातील तेवीसव्या श्लोकावर आधारित प्रवचन करत होते.
डॉ. भोळे पुढे म्हणाले की, “जीवनाचे खरे रहस्य समजण्यासाठी अध्यात्मिक प्रवृत्ती जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर, आत्मा आणि जीवनाचे गूढ हे केवळ अध्यात्माच्या माध्यमातूनच उलगडते. साधुसंतांचा उपदेश मानवाला योग्य जीवनमार्ग दाखवतो. आपण पृथ्वीवर पाहुणे आहोत, मालक नाही, हे भान ठेवून जीवन जगावे.”
या प्रसंगी ह. भ. प. बाळकृष्ण सूर्यवंशी महाराज, डॉ. रवींद्र भोळे महाराज (उरुळी कांचन), ह. भ. प. धनंजय महाराज घोलप, गोकुळ महाराज कुंजीर, ईश्वरी महाराज कुंजीर, सनईकर महाराज (देवाची आळंदी), यादव महाराज यांची प्रवचने झाली. तसेच ह. भ. प. वैभव, श्रावणी, अनुष्का, दत्तात्रय, श्रेयस, गणेश व पायल महाराज कुंजीर यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले.
कार्यक्रमाचे आयोजन अखंड हरिनाम सप्ताह समिती, सरपंच एल. बी. कुंजीर, माजी सरपंच कुसुमताई कुंजीर, पोलिस पाटील मोहन कुंजीर तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व वारकरी भक्त यांच्या पुढाकाराने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे करण्यात आले. या प्रसंगी भाविक भक्तांनी अन्नदान केले तर पंचक्रोशीतील वारकरी, भजन मंडळे व अनेक नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.