पुणे : “सिंधुताई सपकाळ माईंची प्रथम भेट नांदेडमध्ये झाली. त्यांच्या विचारांनी मी तेव्हाच प्रभावित झालो. आयुष्यातील अत्यंत कठीण संकटांवर मात करत त्यांनी कधीही नकारात्मकता स्वीकारली नाही. अपार जिद्द, सकारात्मकता आणि ध्येयवेड त्यांच्या प्रत्येक कृतीत दिसून येते. अर्जुनासारखे लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनी स्वतःचे दुःख विसरून इतरांना आयुष्य अर्पण केले. म्हणूनच त्या समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ ठरतात,” असे प्रतिपादन अप्पर पोलीस महासंचालक व फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख कृष्ण प्रकाश यांनी केले.
सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, मांजरी तर्फे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आणि बालदिनाच्या औचित्याने ‘माई दिनदर्शिका–2026’ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनिष कासोदेकर (लेटर्स अँड स्पिरिट आर्ट क्लब), संस्थाध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ, ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड, दि मदर ग्लोबलचे अध्यक्ष विनय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
“माईंनी हजारो अनाथ मुलांचे जीवन उज्ज्वल केले. पद, सत्ता किंवा राजसत्ता नसतानाही त्यांनी आदर्श राजासारखी सेवा केली. एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करावा तसे त्यांच्या कार्याने असंख्य आयुष्ये उजळली,” असे गौरवोद्गार कृष्ण प्रकाश यांनी काढले.
मनिष कासोदेकर म्हणाले, “माईंवरील ही दिनदर्शिका व्यावसायिक हेतूशिवाय, केवळ समाधान आणि मूल्याधारित कलाकृती म्हणून तयार केली आहे. माईंना समजून घेण्याचा आणि त्यांच्या विचारांचा अर्थपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न यात आहे.”
ममता सपकाळ म्हणाल्या, “आईने स्वतःचे दुःख सहन केले, पण ते कुणालाही भोगावे लागू नये म्हणून ती आयुष्यभर लढली. आजही तिच्या संस्थांद्वारे आम्ही तिचे कार्य पुढे नेत आहोत. त्यामुळे तिचा वाढदिवस आम्हाला ‘जयंती’सारखाच वाटतो.”
‘माई पब्लिकेशन’च्या दिनदर्शिकेच्या विक्रीतून मिळणारा नफा संस्थेतील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भडांगे यांनी केले. पत्रकार सुनिल शेवराबाई ज्ञानदेव भोसले व स्नेहा उत्तम मडावी उपस्थित होते.