पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे आयोजित वार्षिक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव ‘यू-व्हाईब्स 2025’ मोठ्या उत्साहात पार पडला. कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी, तळेगाव, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, सांगली आणि चिचोंडी या नऊ कॅम्पसचे विद्यार्थी एकत्र येत तरुणाईचा रंगतदार जल्लोष अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक, कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे तसेच एमआयटी एडीटी स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या डॉ. अश्विनी पेठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संचालिका डॉ. ज्योती जोतवानी आणि सर्व कॅम्पसचे प्राचार्य उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी नामुगडे म्हणाले, “यू-व्हाईब्ससारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक भान जागृत करून त्यांना अधिक सक्षम घडवतात.”
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी चित्रकला, रांगोळी, मेहेंदी, फेस पेंटिंग, गायन, ग्रुप डान्स आणि टॅलेंट शो या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपल्या कौशल्यांना वाव देत विद्यार्थ्यांनी बहुरंगी सादरीकरणे करून प्रेक्षकांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड यांच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली. कबड्डी, क्रिकेट, लांब उडी, धावणे, पोहणे, बुद्धिबळ, गोळाफेक, थाळी फेक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी जोशात सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या ‘बिझनेस बडीज’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अभिनव व्यावसायिक संकल्पना, विपणन कौशल्य आणि आर्थिक नियोजनाचे उत्तम प्रदर्शन केले.
संचालिका डॉ. जोतवानी म्हणाल्या, “यू-व्हाईब्स हा प्रतिभा, सर्जनशीलता आणि मैत्रीचा उत्सव आहे. विविध कॅम्पसचे विद्यार्थी एकत्र आल्याने संवाद आणि सहकार्यास नवी दिशा मिळते.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या रिपल शर्मा आणि योगेश नागपाल यांनी सर्वांचे आभार मानले.