पुणे : उरुळी कांचन स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचे संकेत आता स्पष्ट होत आहेत. आगामी पंचायत समिती निवडणुकीत उरुळी कांचन पंचायत समिती गणातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या सुदर्शन चौधरी यांच्या पाठिशी सोरतापवाडी ग्रामस्थांनी एकमुखी समर्थनाची भक्कम भिंत उभी केली आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगट, युवकवर्ग तसेच विविध सामाजिक संस्थांच्या उपस्थितीत झालेली बैठक केवळ औपचारिक चर्चा न ठरता ग्रामस्तरावरील लोकभावनेचे संकेत देणारा महत्त्वपूर्ण क्षण ठरला. चौधरी यांच्या नावावर पडलेला एकमताचा शिक्का, स्थानिक राजकारणातील त्यांच्या वाढत्या प्रभावाचीच जणू घोषणा करतो.

ग्रामविकासाची सातत्याने साधना, सर्वसामान्यांशी राखलेला आपुलकीचा वारसा आणि तरुणांमध्ये असलेली मजबूत पकड — या तीन घटकांमुळे चौधरी यांचे नेतृत्व गावकऱ्यांच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, मूलभूत सुविधा यांसह कृषी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

सोरतापवाडी ग्रामस्थांचा हा एकमुखी पाठिंबा, चौधरी यांच्या उमेदवारीला आता नव्या उंचीवर नेणारा ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकतो. उरुळी कांचन गणातील निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित झाले असून, चौधरी हे या स्पर्धेत एक प्रभावी आणि मजबूत दावेदार म्हणून उभे राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *