पुणे: वर्धा जिल्ह्यातील पांढरकवडा येथील पारधी पाढ्यावर ‘परिवर्तनाची पाटशाळा’ हा समाजजागृतीपर उपक्रम उत्साहात पार पडला. पारधी समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवणे, शिक्षणाचा प्रसार वाढवणे, दोन गटांतील तणावाला पूर्णविराम देणे आणि समाजावर दीर्घकाळापासून असलेला कलंक दूर करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. गावकऱ्यांसह तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
मार्गदर्शन करताना समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी “परिवर्तनाची सुरुवात जाणिवांमध्ये बदलातूनच होते” असे प्रतिपादन केले. नशामुक्त जीवनशैली स्वीकारल्यास आणि मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्यास पारधी समाजही सर्वसामान्य समाजाबरोबर अभिमानाने उभा राहू शकतो, असे त्यांनी सांगितले. महिलांचा वाढता सहभाग, तरुण पिढीचे योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी यावरही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
कार्यक्रमानंतर नामदेव भोसले यांनी वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जैन यांची भेट घेतली. पारधी समाजाच्या प्रगतीत पोलिस-प्रशासनाची भूमिका, कायदेशीर संरक्षण, सरकारी योजनांची उपलब्धता आणि मुलांच्या शिक्षणात पोलिसांचा सहभाग या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. समाजसेवक आणि प्रशासनाने संयुक्तपणे पुढाकार घेतल्यास मोठे परिवर्तन शक्य असल्याचे भोसले यांनी नमूद केले.
या उपक्रमाला बाबा भोसले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याची अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली. ‘परिवर्तनाची पाटशाळा’मुळे पारधी समाजाच्या सामाजिक उन्नतीस नवा वेग मिळत असल्याचे चित्र पांढरकवडा परिसरात स्पष्टपणे दिसू लागले आहे.
