पुणे: शहरातील पेट्रोल पंपांवरील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची आज अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फलदायी भेट घेतली. असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान आणि प्रवक्ते अली दारूवाला यांनी शहरातील निवडक पेट्रोल पंपांवर वाढत चाललेल्या सुरक्षाविषयक धोक्यांविषयी सविस्तर माहिती पोलिस प्रशासनाला दिली.
बैठकीदरम्यान कुमार यांनी या सर्व मुद्द्यांना विशेष गांभीर्याने घेत तातडीने कार्यवाही करण्याचा शब्द दिला. विशेषतः, गुन्हेगारीचा सामना करणाऱ्या किंवा संभाव्य धोक्याचा अंदाज असलेल्या पेट्रोल पंपांना फक्त काही मिनिटांत पोलिस मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रतिसादामुळे असोसिएशनच्या प्रतिनिधींमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा निर्माण झाला.
शहरातील अनेक पेट्रोल पंपांना अलीकडच्या दिवसांत सीएनजीच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर दबाव सहन करावा लागत आहे. ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण होत असून त्यातून काही ठिकाणी वाद-विवाद आणि किरकोळ गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे असोसिएशनने निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर प्रभावित पंपांची संपूर्ण यादी लवकरच पोलीस प्रशासनाला सुपूर्द केली जाणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष अमानुल्ला खान यांनी पोलिस आयुक्तांच्या सकारात्मक आणि त्वरित प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, पूर्वी जाहीर केलेला पंप बंद करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेतल्याची माहिती दिली. दरम्यान, प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, “पोलिस आयुक्त अमितेशजी कुमार यांनी आमच्या समस्या त्वरित हाताळल्या. त्यांच्या आश्वासनामुळे पेट्रोल पंपांचे कामकाज अधिक सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने सुरू राहू शकेल.”
