पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघाने सर्व प्रभागांमधून उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. प्रस्थापित पक्ष सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे पर्याय म्हणून महासंघ निवडणुकीत उतरत असल्याची माहिती शहराध्यक्ष तौसिफ अब्बास शेख यांनी पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अकिल पठाण, अस्लम सय्यद, अब्बू बकर सकलेनी, संतोष शिंदे, मयूर गायकवाड, अश्फाक खान, अवेज नाकेदार यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
तौसिफ शेख यांनी सांगितले की, भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघाची स्थापना 1983 मध्ये हाजी मस्तान मिर्झा यांनी केली असून आज संघटना देशभर कार्यरत आहे. हा पक्ष मुस्लिमांसह सिख, ख्रिश्चन, दलित आणि इतर सर्व अल्पसंख्याक समाजांच्या प्रश्नांसाठी लढा देतो. महासंघात विविध समाजघटकांचे प्रतिनिधी सक्रीय असून संघटनेचा विस्तार सातत्याने वाढत आहे.
शेख म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या पक्षांकडून धनाढ्य उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व कमी होते. पुण्यातील झोपडपट्ट्या, सोसायट्या आणि दैनंदिन नागरी समस्यांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्व प्रभागांतून उमेदवार उभे करणार आहोत.”
महासंघाचे पुण्यात मजबूत संघटन असून सर्व मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते सक्रिय आहेत. शहरातील लोकांच्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना तयार केल्याचे शेख यांनी सांगितले. सामान्य मतदारांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
