पुणे: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षीय चिमुरडी यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करत आरोपीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

उरळी कांचन सराफ असोसिएशनच्यावतीने या प्रकरणाचा निषेध नोंदवत, निपक्षपाती तपास करून पीडित बालिकेला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन उरळी कांचन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांना देण्यात आले.

निवेदन देताना सोनार समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उरळी कांचनचे माजी ग्रामपंचायत सदस्य जे. बी. सराफ, संतोष कांचन, महंत गोपालव्यास कपाटे महानुभाव, सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, व्यापारी आघाडीचे विकास जगताप, राजेंद्र तळेगांवकर तसेच अन्य समाजबांधव सहभागी होते.

समाजबांधवांनी पोलिस प्रशासनाला या घटनेचा सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. पीडित कुटुंबाच्या दुःखात सर्व समाज एकजुटीने उभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *