पुणे : संघटित गुन्हेगारीची मुळे उपटण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी केलेली प्रभावी कारवाई मोठ्या यशस्वी ठरली आहे. विमानतळ पोलिस स्टेशन गु.र.नं. ५५८/२०२५ च्या तपासातून समोर आलेल्या धाग्यांवर आधारित पथकाने मध्यप्रदेशातील उमरटी (ता. लेधवा, जि. बडवाणी) येथे चालणारे मोठे अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करी रॅकेट उद्ध्वस्त केले.

परिमंडळ-४ आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त विशेष पथकाने पहाटे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी धाड टाकली. या कारवाईत ३६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात तयार व अर्धवट तयार अग्निशस्त्रे, साहित्य व उपकरणे जप्त करण्यात आली.

पूर्वी पुण्यातील गुन्ह्यांतून २१ अवैध शस्त्रे जप्त झाली होती. या शस्त्रांचा पुरवठा कुठून होतो याचा माग घेत असताना उमरटी गावात ‘उमरटी शिकलगार आर्म्स (USA)’ या बनावट नावाखाली मोठा बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात ५० भट्ट्या नष्ट करण्यात आल्या. या भट्ट्यांतून शस्त्रांचे मोल्डिंग तसेच विविध भाग तयार केले जात होते. अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, मोल्ड, स्पेअर, विशेष उपकरणे आणि मोठी मात्रा तयार–अर्धवट तयार शस्त्रांचीही जप्ती झाली.

ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून शस्त्रपुरवठ्याची साखळी, प्राप्तधारक, तस्करी मार्ग आणि अन्य राज्यांमध्ये असलेल्या संपर्कांविषयी महत्त्वाची माहिती मिळत असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाईदरम्यान पथकासोबत क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तैनात होती. मोबाइल सर्व्हेलन्स व्हेईकल, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेटप्रूफ जॅकेट, बॉडी वॉर्न कॅमेरे यांसारख्या प्रगत तांत्रिक साधनांचा वापर करून ही मोहीम उच्च सुरक्षा पातळीवर पार पडली.

ही महत्त्वपूर्ण धाड पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख तसेच पोलिस उपआयुक्त निखिल पिंगळे यांच्या देखरेखीखाली राबवण्यात आली. संपूर्ण ऑपरेशन उपआयुक्त (परिमंडळ-४) सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. गुन्हे शाखेचे निरीक्षक वाहिद पठाण आणि त्यांच्या पथकाने पुण्यापासून तब्बल ५०० किलोमीटर अंतर कापत ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *