प्रज्ञा आबनावे, प्रतिनिधी
पुणे – राज्यातील स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सृष्टी बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेतर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार 2025’ सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर आणि माई सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून झाली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. मिनाक्षी डोंगरे यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. स्मिता बारवकर यांचे स्वागत केले. प्रस्ताविक कु. श्रेया साळवे यांनी मांडले.
अनिता काळे, सौ. संगीता शिंदे, सुवर्णा इंगोले, मीरा पाटील, सौ. नंदा डेरे आणि डॉ. सुजाता कोठाळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. स्मिता बारवकर यांनी महिलांनी वाचनाची सवय वाढवून प्रगल्भ विचार स्वीकारावेत, असे आवाहन केले. सुवर्णा इंगोले यांनी महिलांना विकासाच्या समान संधी व अत्याचाराविरोधातील जागरूकतेची गरज अधोरेखित केली. ‘स्त्री ही चैतन्यशक्ती आहे,’ असे सौ. नंदा डेरे यांनी मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात अनिता काळे म्हणाल्या, “महिला म्हणजे कुटुंबाचा कणा असून आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारून त्या सामाजिक कार्यासाठी पुढे आल्या पाहिजेत.”
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिलांना ‘महाराष्ट्र समाज भूषण 2025’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा मिनाक्षी डोंगरे, उपाध्यक्षा माधुरी साळवे, सचिव भारती एकलारे, संचालक विकास डोंगरे व अनिल चाटे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. तेजश्री पुरंदरे व चेतना शर्मा यांनी केले. शेवटी चेतना शर्मा यांनी आभार मानले.
