पुणे : महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाबीर देवस्थानमुळे परिचित असलेल्या रुई बाबीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या ॲड. सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच नयना पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी ॲड. मारकड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी (मंडल) शेळके यांनी मारकड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
सरपंच आणि उपसरपंच दोन्ही महिला झाल्यामुळे ग्रामस्थांनी महिलांना अधिक न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. निवडीच्या प्रसंगी सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, हरिकाका माने, कुमारशेठ माने यांनी ॲड. मारकड यांचा सन्मान केला.
निवडीनंतर संवाद साधताना ॲड. सुप्रिया मारकड म्हणाल्या, “माझ्या निवडीचे सर्व श्रेय मा. सभापती प्रविण माने यांच्या मार्गदर्शनाला जाते. ग्रामस्थांच्या व आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. प्रत्येक विकासकामासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
निवडीनंतर ग्रामस्थ व सर्व सदस्य उपस्थित होते आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे सोहळा पार पडला.