पुणे : कोरेगाव भीमा (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीत दिव्यांग निधीच्या वाटपातील गंभीर अनियमितता, निधी दडपशाही व भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी ‘भिक मागो आंदोलन’ छेडत ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्यानंतर गटविकास अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावचे रहिवासी पंडित वारे हे नेत्रहीन दिव्यांग असून, सन २०१८-१९ मध्ये ५% दिव्यांग निधीअंतर्गत एकाही रुपयाचा लाभ त्यांना देण्यात आला नाही. याच काळात इतर दिव्यांग लाभार्थ्यांना मात्र संबंधित निधीचे वाटप करण्यात आल्याचे दस्तऐवजांतून दिसून आले. तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षातही वारे यांना इतरांच्या तुलनेत कमी निधी मंजूर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राहिलेला निधी समप्रमाणात देण्याची मागणी आघाडीने केली.
याचबरोबर, प्रहार अपंग संयुक्त सहाय्य समूहाला ग्रामपंचायतीने रु. १६,४५,१९२ देऊ केल्याचे नोंद असताना, त्यांच्या खात्यात प्रत्यक्षात फक्त १३,९६,११२ रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे. या रकमेतील तफावत गंभीर स्वरूपाची असून निधीच्या वापराबाबत संशय अधिकच गडद होत असल्याचे आघाडीने म्हटले.
माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांतही ५% दिव्यांग निधीचा सदर आर्थिक वर्षात वापर न करता तो ग्रामपंचायतीतच पडून ठेवण्यात आल्याचे उघड झाले. दि. २५ जून २०१८ च्या परिपत्रकानुसार हा निधी त्याच वर्षी खर्च करणे बंधनकारक असतानाही संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांनी तो न केल्याचा आरोप करण्यात आला. शिवाय, पूरक कागदपत्रे मागणी करूनही ग्रामसेवकाने अद्याप न दिल्यामुळे पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट झाल्याचे निवेदनात नमूद आहे.
वंचित बहुजन आघाडीने २०१७-१८ ते २०२५-२६ या कालावधीतील सर्व दप्तरांची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
