पुणे : हवेली तहसीलदारपदी डॉ. अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शुक्रवारी (ता. १४) यासंदर्भात आदेश जारी केले.

हवेलीचे तत्कालीन तहसीलदार किरण सुरवसे यांची सोलापूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सध्या सोलापूर निवडणूक विभागात कार्यरत असलेल्या तहसीलदार डॉ. अर्चना निकम यांची हवेली तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. निकम यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये अप्पर तहसीलदार म्हणून कार्य केले आहे. देहू आणि आळंदी येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी प्रशासनाच्या सुविधा प्रभावीपणे राबवून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. तसेच बारामतीचे तहसीलदार म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्यांचे पालन करताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ४(४) व ४(५) नुसार तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या करण्यात आलेल्या असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *