स्नेहा मडावी, प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे — आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्थेतर्फे १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ८ वा नैसर्गिक चिकित्सा दिन निसर्ग ग्राम कॅम्पस, येवलेवाडी, पुणे येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या विशेष दिवशी “नैसर्गिक चिकितसेद्वारे नैसर्गिकरित्या वजन कमी करणे” या विषयावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात येतील. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत, तसेच भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, NIN विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रस्तुती, इंटर-कॉलेज मीट, कायरोप्रॅक्टिक कार्यशाळा, फूड फेअर या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
या कार्यक्रमात संस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच आमंत्रित मान्यवर उत्साहात सहभाग नोंदवणार असून विशेष अतिथ्य व्यवस्था, माध्यम व्यवस्थापन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
ही घटना नैसर्गिक चिकित्सा, योग आणि गांधीवादी आरोग्यदृष्टीकोनाच्या प्रसारासाठी NIN च्या प्रयत्नांची पुष्टी करते. महात्मा गांधींच्या नैसर्गिक, साध्या व शाश्वत जीवनशैलीच्या तत्त्वांशी संस्थेची दिशा कायम सुसंगत राहते, अशी माहिती NIN चे प्रकाशन अधिकारी सौरभ साकल्ले यांनी दिली.