पुणे : किरकोळ वादातून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील तुपे वस्ती येथील प्रिन्स जनरल स्टोअर्ससमोर मंगळवारी (ता. २५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रभाकर नारायण तुपे (वय ५५) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब नारायण तुपे (वय ६६) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी स्वप्निल बाळु ओव्होळ (वय २५, रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर तुपे हे दुकानासमोर बसल्यामुळे गोंधळ होत असल्याचे कारण सांगत आरोपी स्वप्निल बाळु ओव्होळ याने त्यांच्याशी वाद घातला. वाद वाढत जाऊन स्वप्निल ओव्होळ याने प्रभाकर तुपे यांच्यावर शिवीगाळ, धमकीबाजी केली. त्यानंतर जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने पोटावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले.
उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ३१२/२०२५, कलम १०९, ३४२, ३५१(२), भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल केला आहे.
हल्ल्यानंतर आरोपी स्वप्निल ओव्होळ हा फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली. जखमी प्रभाकर तुपे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
