पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील क्रीडापटू कुणाल संतोष शिर्के याने महाराष्ट्र किक बॉक्सिंग संघ आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत अठरा वर्षांखालील ७९ किलो गटात सुवर्णपदक पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले.
ही स्पर्धा २० ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी (पुणे) येथे पार पडल्या. सुवर्णपदक विजयानंतर महाविद्यालयाच्या वतीने त्याचा सत्कार महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन यांच्या हस्ते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, परीक्षा अधिकारी प्रा. नंदिनी सोनवणे, प्रा. ज्ञानदेव पिंजारी, आयक्यूएसी प्रमुख प्रा. डॉ. निलेश शितोळे, प्रा. कृष्णा गुंड, कार्यालय अधीक्षक प्रदीप राजपूत उपस्थित होते.
कुणाल हा उरुळी कांचन येथील सनशाईन मार्शल आर्ट क्लबमध्ये सराव करीत असून, प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी त्याच्या यशाचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
