पुणे : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आळंदी म्हातोबाची येथे वास्तव्यास असलेले आदिवासी पारधी समाजातील लक्ष्मण रीजमीट काळे आणि त्यांचे कुटुंब गेल्या ९० वर्षांपासून शासकीय योजनांपासून वंचित आहेत. घरकुल, अन्न सुरक्षा योजना, आरोग्य सेवा, वृद्धापकाळ पेन्शन यांसारख्या कोणत्याही सुविधांचा लाभ त्यांना मिळालेला नाही. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही लक्ष्मण काळे यांच्याकडे स्वतःचे घर नसून, पुण्यातील कॅम्प परिसरात फुटपाथवर भिक्षावृत्ती करून ते उदरनिर्वाह करतात.
२०१० पासून त्यांनी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा अर्ज सादर केले, मात्र जातीय भेदभावामुळे वारंवार नकार मिळाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत, काळे कुटुंबाला कायमस्वरूपी राहण्यासाठी किमान दोन गुंठे जागा मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच घरकुल, अन्न सुरक्षा व सामाजिक सुरक्षा योजना तातडीने लागू कराव्यात, तसेच गेल्या ९० वर्षांपासून चालू असलेल्या जातीय उपेक्षेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
“जिवंत असताना राहण्यासाठी जागा द्या; न दिल्यास मृत्यूनंतर तरी दफनासाठी जागा द्या,” अशी हृदयस्पर्शी विनंती भोसले यांनी निवेदनाद्वारे केली. या वेळी राजेंद्र टिळेकर, पोपटराव ताम्हाणे, पत्रकार सुनील भोसले, बलवर पवार, कुणाल भोसले, बाबा भोसले, सचिन भोसले आदी उपस्थित होते.