पुणे – कर्णबधिर मुलांना पुन्हा आवाजाच्या विश्वात आणणाऱ्या चिंचवड येथील मोरया हॉस्पिटलने ३०० यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियांचा टप्पा गाठत रविवारी एक भावनिक सोहळा साजरा केला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यात दाटलेले कृतज्ञतेचे अश्रू पाहून संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि हळवे झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी या संवेदनशील सेवाप्रकल्पाचे मनापासून कौतुक करत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. कॉक्लिअर इम्प्लांटची गरज असलेल्या दहा मुलांचे संपूर्ण पालकत्व चंद्ररंग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
महाभारतातील उदाहरण देत त्यांनी मोरया हॉस्पिटलचे कार्य ‘आधुनिक काळातील संजय’ असे संबोधले. “जगाचा आवाज या मुलांना पुन्हा ऐकू देण्याचे देवकार्य ही टीम करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले.
शस्त्रक्रियेनंतर ऐकू व बोलू लागलेल्या नीरजा घोडके, देवांश पाटील, आसावरी कुलकर्णी, रितिका सोमाणी, ओम साठे आणि प्रथमेश सावंत यांनी अनुभव कथन केले. एका पालकांनी “माझं मूल आज ‘आई’ म्हणतंय… यापेक्षा मोठं सुख नाही,” असे सांगताच सभागृहात अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटले.
व्यासपीठावर RSS चे कैलास सोनटक्के, डॉ. महेंद्र गरड, उद्योजक दिलीप व प्रवीण सोनिगरा, तसेच मोरया हॉस्पिटलचे डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. अरविंद पंडित, डॉ. उदय यन्नेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अक्षय वाचासुंदर, अमित पाटील, मुग्धा आरकडी, रक्षा देशपांडे यांनी ३०० शस्त्रक्रियांच्या मागील टीमवर्क आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती दिली.
डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी प्रास्ताविक केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद पंडित यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन भगवान तांबे, सारिका मोरे, संजय कुलकर्णी आणि संपूर्ण कर्मचारीवर्गाने सांभाळले.