पुणे : पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर झालेल्या माघारीनंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झाली असून निवडणुकीचा ताप वाढू लागला आहे.
अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १९३ अर्जांपैकी तब्बल ३४ उमेदवारांनी माघार घेतली असून १५९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर नगरसेवक पदासाठी २,६७१ अर्जांपैकी ५७४ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २,०९७ उमेदवार आता मैदानात आहेत. आजपासून अधिकृत प्रचारालाही वेग आला असून सर्वच ठिकाणी उमेदवारांनी घराघरात पोहोचण्यासाठी मोर्चा वळवला आहे.
तालुकानिहाय स्थिती :
बारामती : २४२ सदस्य अर्जांपैकी ७७ माघार; अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार
इंदापूर : सदस्यपदासाठी १५० अर्जांपैकी ७१ माघार; अध्यक्षपदासाठी ६ उमेदवार
लोणावळा : १३३ सदस्य अर्जांपैकी ३१ माघार; अध्यक्षपदासाठी ८ उमेदवार
दौंड : १२६ सदस्य अर्जांपैकी ३५ माघार; अध्यक्षपदासाठी ८ उमेदवार
माघारीनंतर सर्व १७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचारयुद्धाला जोर आला आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारांनी मतदारसंघात आपली ताकद झोकून देत रणधुमाळी अधिकच रंगात आणली आहे.
