पुणे : लहुजी शक्ती सेना (महाराष्ट्र राज्य) तर्फे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी आयोजित “मुंबई ते नागपूर महापदयात्रा” राज्यभर उत्साहात सुरू आहे. या यात्रेचे उरुळी कांचन येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले.
ही पदयात्रा २ नोव्हेंबर रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे उद्यान, सुमन नगर (चेंबूर, मुंबई) येथून सुरू झाली असून, १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील यशवंत स्टेडियमवर भव्य मोर्चाद्वारे समारोप होणार आहे.
लोणी काळभोर येथे यात्रेचा मुक्काम झाला. सामाजिक कार्यकर्ते राकेश लोंढे, विजय सकट, नितीन लोखंडे, आकाश म्हात्रे व बहुजन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद वैराट यांनी यात्रेचे स्वागत करून भोजन व निवासाची व्यवस्था केली. कुंजीरवाडी येथे माजी सरपंच सचिन तुपे यांनी थेऊर फाट्यावर स्वागत करून अल्पोहार दिला. सरपंच हरेश गोठे, अमोल व किशोर लोंढे, अण्णा खलसे, समाधान बोराडे, माऊली व कृष्णा राखपसरे यांनी यात्रेचे स्वागत केले.
उरुळी कांचन येथे ग्रामपंचायत सदस्य शंकर बडेकर यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात आले. माजी उपसभापती हेमलता बडेकर, भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा सारिका लोणारी, सामाजिक कार्यकर्ते शक्ती बडेकर, एबीएस क्रांती फोर्स अध्यक्ष राजाभाऊ आढागळे, जिल्हाध्यक्ष विलास झोंबडे, दलित पॅंथरचे अनिल साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हेमलता बडेकर यांनी यात्रेतील कार्यकर्त्यांना केळी व पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या.
या महापदयात्रेद्वारे समाजाच्या आठ प्रमुख मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार असून, नागपूर अधिवेशनात हजारो कार्यकर्ते सरकारसमोर समाजाच्या हक्कांचा आवाज बुलंद करणार आहेत.