पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझ किड्स मार्केट’ या अनोख्या उपक्रमाला पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य यश मिळवून दिले. नर्सरी ते इयत्ता नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेची आणि उद्योजकतेची उत्कृष्ट झलक सादर केली.

उपक्रमात विद्यार्थिनींनी हस्तकला वस्तू, चित्रकला, विविध खाद्यपदार्थ, मजेशीर खेळ यांसोबतच आठवडी बाजाराची झलक दाखवणारे आकर्षक स्टॉल्स उभारले. प्रत्येक विद्यार्थिनीने ग्राहकांशी संवाद साधत वस्तूंची विक्री केली आणि आर्थिक व्यवहार आत्मविश्वासाने हाताळले. मुलींच्या व्यवस्थापन कौशल्याचे, कल्पकतेचे आणि मेहनतीचे विशेष कौतुक पालकांनी व उपस्थित नागरिकांनी केले.

कार्यक्रमाला संस्थेचे आधारस्तंभ सुरेश कांचन, संचालिका नयॉन सुरेश कांचन, प्राचार्य डॉ. नुपूर कांचन, लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या सल्लागार अक्षदा कांचन, पंडित कांचन यांच्यासह स्थानिक व्यावसायिक, प्रतिष्ठित व्यक्ती, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खरेदी करत विद्यार्थिनींना हुरूप दिला.

या उपक्रमातून मुलींना बाजारात वस्तूंची विक्री कशी होते, पैशांचे व्यवस्थापन कसे करावे, हिशोब कसा ठेवावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांच्या उद्योजकतेला महत्त्वपूर्ण चालना मिळाल्याचे प्राचार्या डॉ. नुपूर कांचन आणि संचालिका नयॉन कांचन यांनी
सांगितले. पुढील वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *