पुणे : आरोग्यदूत युवराज हिरामण काकडे व पल्लवी काकडे यांच्या उपक्रमातून थेऊर पेशवेवाडा येथे आयोजित केलेल्या सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १७७० हून अधिक नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून समाजातील वाढती आरोग्यजागृती अधोरेखित केली.

या शिबिरात १२६० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ८२० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करून त्यांना तात्काळ दिलासा देण्यात आला. विशेष म्हणजे, ३८ रुग्णांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर येत्या काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती युवराज काकडे यांनी दिली. तसेच तीन नागरिकांना कृत्रिम हात-पाय देण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

शिबिरात हृदयविकार तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची घनता तपासणी, स्त्रीरोग तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब मापन, शुगर चाचणी तसेच कान-नाक-घसा तपासणी अशा विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध होत्या. हात-पायांच्या कृत्रिम अवयवांसाठी स्वतंत्र नोंदणी सुविधा देखील देण्यात आली होती.

या सर्वसमावेशक आरोग्य उपक्रमामुळे थेऊर व परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी बहुविध आरोग्य सेवा मिळण्याची संधी प्राप्त झाली. शिबिराच्या सुव्यवस्थित आयोजनाबद्दल आणि सर्वसमावेशक नियोजनाबद्दल आरोग्यदूत युवराज काकडे व पल्लवी युवराज काकडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या शिबिरामुळे सामान्य नागरिकांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता वाढून आरोग्य संवर्धनाची दिशा अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *