पुणे : महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीतील अविभाज्य घटक असलेल्या हुरड्याच्या दिवसांना प्रारंभ झाला असून, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या पर्वात ‘नेचर नेस्ट ऍग्रो टुरिझम’ (कोरेगावमूळ, ता. हवेली) येथे हुरडा पार्टीचा शुभारंभ आज उत्साहात झाला.
हुरडा म्हणजे केवळ खाण्याचा सोहळा नव्हे, तर नातेसंबंध अधिक दृढ करणारा, मैत्रीचे धागे अधिक मजबूत करणारा एक सांस्कृतिक सण आहे. याच हेतूने नेचर नेस्ट ऍग्रो टुरिझम तर्फे निसर्गाच्या सान्निध्यात हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले असून, निसर्ग व कृषी पर्यटनाला चालना देण्याचाही उद्देश आहे.
बालचमूसाठी खेळण्याची विविध माध्यमे, निसर्गरम्य परिसर आणि पारंपरिक ग्रामीण वातावरण यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतो. घरातील सगळ्या नात्यांना एकत्र आणणारे, गप्पा, हशा आणि आठवणींनी भरलेले हे ‘गेट-टुगेदर’ खवय्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
‘नेचर नेस्ट ऍग्रो टुरिझम’चे सर्वेसर्वा चंद्रशेखर शितोळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व पाहुण्यांची योग्य प्रकारे आतिथ्यशीलपणे काळजी घेतली जात असून, प्रत्येकाला ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या हुरडा पार्टीच्या शुभारंभप्रसंगी माजी सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन कड, चंद्रशेखर विजयराव शितोळे, स्नेहल चोरडीया, अमोल भोसले, संजय सणस, योगिनी शितोळे, नयनतारा शिंदे, राणी शिंदे, प्रमोद बोधे, अशोक कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना उपस्थित मान्यवरांनी हुरडा पार्टीसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण संस्कृतीला चालना मिळते, समाजात एकोपा वाढतो आणि कृषी पर्यटनाला नवी दिशा मिळते, असे मत व्यक्त केले.