अष्टापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात सम्पन्न

पुणे: अष्टापूर (ता. हवेली) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यालयाचे दोन होतकरू माजी विद्यार्थी सोनुल अण्णासाहेब कोतवाल व विकास विठ्ठल भोसले यांच्या सत्काराचा भव्य समारंभ उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेतून क्लास-वन अधिकारी म्हणून सोनुल कोतवाल यांची, तर मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून विकास भोसले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

शाळा समितीचे अध्यक्ष आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते दोघांना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना सोनुल कोतवाल म्हणाले, “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे केंद्र नव्हे, तर जीवनाला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांच्यामुळे कोणतेही यश साध्य करता येते.” विद्यार्थ्यांनी मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या अभ्यासापासून विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल म्हणाले, “शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी फुले आहेत, तर यशस्वी झालेले माजी विद्यार्थी म्हणजे त्या झाडाला लागलेली गोड फळे. त्यांच्या यशाने शाळा आणि गावाचा अभिमान वाढतो.” समिती सदस्य विजय कोतवाल आणि नितीनशेठ मेमाणे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या संघर्षमय वाटचालीचे कौतुक करत उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे नियामक मंडळ सदस्य रमेश कोतवाल, माजी सरपंच दत्तात्रय कटके, अश्विनी कोतवाल, भैरवनाथ प्रासादिक दिंडीचे माजी अध्यक्ष शामराव वारे, पोलिस पाटील कैलास कोतवाल, विठ्ठल भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका सुशीला सातपुते यांनी तर आभारप्रदर्शन सहशिक्षक नवनाथ भागवत यांनी केले. उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *