स्नेहा मडावी, प्रतिनिधी
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन जन्मभूमी श्रीक्षेत्र आपेगाव येथे ‘संत ज्ञानोबाराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन’ मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडले. ‘साहित्याच्या माध्यमातून संत विचारांचा प्रसार’ हा संकल्प घेऊन आयोजित या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखिका उर्मिला चाकूरकर यांच्या हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष संजय कावरे, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर, आर्किटेक्ट महेश साळुंके, उद्योजक सागर शिंदे, लेखक संजय गोराडे, आणि भजनसम्राट सदानंद मगर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनात महाराष्ट्रातील ६५ नामांकित साहित्यिकांना ‘ज्ञानरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानाने संत परंपरेचा गौरव वाढवून नव्या साहित्यिकांना प्रेरणादायी दिशा दिली.
पुरस्कार समारंभानंतर ‘हासू आणि आसू’ या रंगतदार कार्यक्रमात लोककवी विजय पोहनेरकर, संजय कावरे आणि नितीन वरणकार यांच्या रचना प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ठरल्या. या दरम्यान ह.भ.प. प्रा. दिगंबर ढोकले यांनी आध्यात्मविवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांची सखोल मुलाखत घेतली. ‘श्रीक्षेत्र आपेगाव ही संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांची जन्मभूमी’ या विषयावर ज्ञानमय संवाद रंगला.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री मंदिरात दीपोत्सवाचा दैवी सोहळा साजरा झाला. हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला. ‘पसायदान’ पठणाने संमेलनाची सांगता करण्यात आली. संमेलनाचे आयोजन लोककवी विजय पोहनेरकर, कवयित्री अलका बोर्डे, चित्रकार अरविंद शेलार, उद्योजक शांताराम गायकवाड आणि लेखक संदीप राक्षे यांनी केले. सूत्रसंचालन कवयित्री निशा कापडे, स्नेहल येवला आणि डॉ. अंजना भंडारी यांनी प्रभावीरीत्या पार पाडले.